यांचे वचननामे म्हणजे गाजरांचा पाऊस : सुप्रिया सुळे

मुंबई – भाजप-शिवसेनेचा वचननामा म्हणजे गाजरांचा पाऊस आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सुप्रिया सुळे यांना डेंग्यू झाल्याने त्या काही दिवसांपासून प्रचारासाठी उतरल्या नव्हत्या. आज अखेर त्या प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्या असून त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजप आणि शिवसेना यांचे सरकार हे केलेली विकासकामे सांगू शकत नाहीत. कारण त्यांनी कोणतीही विकासकामे केलेली नाहीत. एवढंच नाही तर यांचे वचननामे म्हणजे गाजरांचा पाऊस आहे, असाही टोला त्यांनी लगावला.

शरद पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत विचारलं असता, मागील पाच दशकांपासून शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही, हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्याचमुळे शरद पवारांवर टीका केली जाते असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. काश्‍मीरमधून अनुच्छेद 370 हटवण्यात आल्याचे देशातले नेते सांगत आहेत. त्याबाबत केंद्राचे अभिनंदन! मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत हा मुद्दा का आणत आहात? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

सुप्रिया सुळे यांना 10 रुपयात थाळी आणि 5 रुपयात थाळी याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या, की या दोन्ही पक्षांचे जाहीरनामे म्हणजे गाजरांचा पाऊस आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायम अतिआत्मविश्वासात वावरत असतात. या खेपेला परिवर्तन नक्की होणार आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार येणार, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.