हिंंगोली – शिवसेनेच्या शिंदे गटातील बेबनाव हिंगोलीच्या नियोजन समितीच्या बैठकीत उघड झाला आहे. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी हेमंत पाटील यांनी मंत्र्यांना चक्क शिवीगाळ केल्याचे वृत्त आहे. ही ऑनलाइन बैठक होती. त्यात वाद झाल्याने शेवटी बैठकीचा आवाज म्युट करावा लागल्याचीही खबर आहे.
नियोजन आयोगाच्या निधी वाटपातून हा वाद झाला. त्यात आक्षेपार्ह वाटप झाल्याचा दावा करीत खासदार पाटील हमरीतुमरीवर आले आणि त्यांनी पालकमंत्र्यांवर चांगलीच आगपाखड केली. त्यांनी त्यांना उद्देशून अपशब्दही वापरल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर त्याच्या बातम्याही प्रसारीत झाल्या. परंतु त्यावर दोघांकडूनही काही भाष्य आलेले नाही.