Prakash Ambedkar : देशात लोकसभा निवडणुकीचं लवकरच बिगूल वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवत असून, एकमेकांवर जोरदार टीकास्त्र देखील सोडत आहेत.
अश्यातच, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांना खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याबाबत सर्वात मोठा दावा केला आहे.
नवनीत राणा पुढच्या 6 महिन्यांमध्ये जेलमध्ये दिसतील, असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
यावेळी त्यांना आमदार रवी राणा यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी रवी राणा यांनी तुमचा पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. आता या निवडणुकीतही तुम्ही पाठिंबा देणार का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारला.
त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी अतिशय खळबळजनक उत्तर दिलं. ते म्हणाले… ‘म्हणूनच रवी राणाची मिसेस (Navneet Rana) कोर्टात घिरट्या घालत आहे, सहा महिन्यांमध्ये ती जेलमध्ये दिसेल”, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यांच्या या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.