Himachal snowfall – बर्फवृष्टी आणि पावसामुळे हिमाचल प्रदेशातील १६८ रस्ते वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आले आहेत. स्थानिक हवामान कार्यालयाने हिमाचल प्रदेशमध्ये ४ एप्रिलपर्यंत बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे तेथे येाग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
हिमाचल रोडवेज ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस शनिवारी सकाळी बर्फात घसरल्याने किन्नौर जिल्ह्यातील मालिंगजवळ पलटी झाली, परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मनालीजवळील रोहतांग येथील अटल बोगद्यावर प्रचंड बर्फवृष्टीमुळे वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या २४ तासांत कल्पा आणि कुकुमसेरी येथे ५ सेंटीमीटर तर केलाँगमध्ये ३ सेंटीमीटर बर्फवृष्टी झाली.
राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी रात्री राज्यातील तीन राष्ट्रीय महामार्गांसह एकूण १६८ रस्ते वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. यातील बहुतेक रस्ते लाहौल आणि स्पितीमधील अवघड भागात आहेत,
जिथे १५८ रस्ते अद्याप उघडायचे आहेत. राज्याची राजधानी शिमला आणि इतर काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अधूनमधून पाऊस पडला आणि सोलनमध्ये गारपिटीमुळे प्रवास करणे कठीण झाले. । Himachal snowfall