Lok Sabha Election 2024 : राजकारण आणि ग्लॅमर जग बऱ्याच काळापासून एकत्र आहेत. चित्रपटसृष्टीतील व्यक्तींच्या मदतीने निवडणुकीत गर्दी जमवण्याची युक्तीही जुनी आणि आजमावली गेली आहे. पण यावेळी विशेषत: उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत बॉलीवूडचा सहभाग दिसत नाहीत. यावेळी निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातील प्रमुख पक्षांच्या स्टार प्रचारकांची यादी पाहिली तर चित्रपट जगताशी संबंधित असलेल्या हेमा मालिनी आणि जया बच्चन यांचीच नावे दिसून येतील.
या दोनही महिला नेत्यांना त्यांच्या ग्लॅमरमुळे नव्हे तर राजकीय सक्रियतेमुळे स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे. हेमा मालिनी आणि जया बच्चन या दोघीनींही राजकारणात प्रवेश करून २५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने मनोज तिवारी, दिनेश यादव निरहुआ आणि रविकिशन या भोजपुरी स्टार्सची मदत घेतलेली नाही. नुकतेच भाजपने अभिनेत्री कंगना राणावत आणि बॉलिवूडचा ‘राम’ अरुण गोविल यांना तिकीट दिले असून, त्यांनाही सध्या तरी स्टार प्रचारकांच्या यादीतून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी सपाच्या यादीत राज्यसभा खासदार जया बच्चन आहेत. | Lok Sabha Election 2024
सपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहिलेले दिवंगत नेते अमर सिंह यांचा बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये बऱ्यापैकी प्रभाव होता. त्यांनी जयाप्रदा यांना खासदार केले. त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन आणि संजय दत्त यांना सपाच्या बाजूने प्रचार करायला लावला होता. राज बब्बर १९९४ मध्ये राज्यसभा खासदार होते आणि त्यानंतर २००४ मध्ये फिरोजाबादमधून सपा खासदार होते. भोजपुरी चित्रपट स्टार रवी किशन हे देखील गोरखपूरमधून भाजपचे खासदार आहेत. | Lok Sabha Election 2024
रामपूरमधून अनेकदा निवडणूक लढवलेल्या जयाप्रदा यावेळी निवडणुकीच्या मैदानातून गायब आहेत. मागील निवडणुकीत चित्रपट अभिनेत्री नगमा, चंकी पांडे, गोविंदा, अमिषा पटेल, शमिता शेट्टी, विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी आणि सोनाक्षी सिन्हा यांसारखे अनेक स्टार्स प्रचारात बराच काळ चमकले, पण यावेळी ते मैदानाबाहेर आहेत.
लखनौत चित्रपट कलाकारांचे वर्चस्व नाही
अनेक सिनेतारकांनी नवाबांच्या शहरातून राजकारणाच्या जगात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी झाले. १९९६ च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने राज बब्बर यांना मैदानात उतरवले होते, पण ते अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमोर उभे राहू शकले नाहीत. १९९८ मध्ये सपाने चित्रपट निर्माते मुझफ्फर अली यांना उमेदवारी दिली, परंतु त्यांनाही वाजपेयींसमोर पराभवाची चव चाखावी लागली. | Lok Sabha Election 2024
२००९ मध्ये सपाने अभिनेत्री नफिसा अलीला भाजप नेते लालजी टंडन यांच्या विरोधात उमेदवारी दिली, पण ती चौथ्या स्थानावर राहिली. २०१९ मध्ये सपाने सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या विरोधात उमेदवार म्हणून उमेदवारी दिली होती, परंतु लखनौच्या जनतेने त्यांनाही नाकारले.