सध्या हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या जोडीचा “वॉर’ हा चित्रपट कमालीचा चर्चेतही आहे आणि तिकीट खिडकीवरही धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर ओपनिंगलाच 51 कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. साहजिकच, या तुफान प्रतिसादामुळे चित्रपटातील कलाकार आणि निर्माते दिग्दर्शक कमालीचे आनंदी आहेत.
समीक्षकांनीही या चित्रपटाची प्रशंसा केलेली आहे. इतकेच नव्हे तर समीक्षक अनुपमा चोप्रा यांनी “चार्लीज एंजेल्स’ या हॉलीवूडपटावर आधारित असलेल्या “वॉर’ या चित्रपटाचे फीमेल व्हर्जन बनवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कोणी असा चित्रपट बनवेल का, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
त्याचबरोबर दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि सारा अली खान या नायिका चार्ली एंजेलपेक्षा कमी नाहीत अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. त्यांच्या या प्रस्ताव-प्रतिक्रियेवर तात्काळ आलिया भट्टने “ये ये ये’ असे उत्तर दिले आहे.
आलियाला हा प्रस्ताव आवडला असून आपण वॉरच्या फीमेल व्हर्जनमध्ये काम करण्यास तयार असल्याचे तिने सांगितले आहे.