मुंबई – चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना अटकेपासून कोणताही दिलासा देण्यास नकार देत मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या चित्रपटात लहान मुलांशी संबंधित काही आक्षेपार्ह दृश्यांवरून माहिम पोलीस स्टेशनमध्ये “पोक्सो’ आणि “आयटी’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “नाय वरण-भात लोणचा, कोन नाय कोणचा’ या चित्रपटातील काही वादग्रस्त दृष्यांवरून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सुनावणी घेणारं नियमित खंडपीठ सध्या कार्यरत नसल्याने यावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी झाली. या सुनावणीत अटकेची कारवाई करण्यापासून मुंबई पोलिसांना रोखण्यात यावे, अशी मागणी मांजरेकर यांच्या वतीने करण्यात आली.
ज्याला राज्य सरकारकडून विरोध करण्यात आला. यामुळे हायकोर्टाने मांजरेकरांना कोणताही दिलासा नकार देत सोमवारी नियमित खंडपीठापुढे दाद मागण्याचे निर्देश महेश मांजरेकरांना दिले आहेत.