नाशिक – पोलिस कर्मचाऱ्याने ओढा येथे रेल्वे खाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल तानाजी जमदाडे असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. जमदाडे हे नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात हजेरी मास्तर म्हणून कार्यरत होते. अनिल जमदाडे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 24) फेब्रुवारी रोजी ते पोलीस ठाण्यातून काम करून घरी निघाले होते. घरी न जाता त्यांनी घराजवळील ओळखीच्या सलूनच्या दुकानाजवळ दुचाकी लावली. काही वेळाने माझा मुलगा गाडी घेऊन जाईल असे सलून मालकाला सांगून ते तेथून निघून गेले. त्यानंतर दुपारच्या सुमारास एका पोलीसाने ओढा येथे रेल्वे खाली आत्महत्या केल्याची माहिती आडगाव पोलीसांना मिळाली. पोलिसांचे पथक घटना स्थळी दाखल झाले असता मयत पंचवटी पोलीस ठाण्यातील कर्मचारी असल्याचे समोर आले.
जमदाडे हे मुळचे दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील रहिवाशी होते. सध्या ते रासबिहारि लिंकरोड परिसरात स्थायिक झाले होते. 1991ला ते पोलिस दलात भरती झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पंचवटी पोलीस ठाण्यात बदली झाली होती. त्याआधी ते म्हसरूळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सध्या ते पंचवटी पोलीस ठाण्यात हजेरी मास्तर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.