सलग दोनवेळा अध्यक्ष होण्याचा मिळाला मान
पुणे – महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची पुन्हा निवड झाली आहे. रासने यांनी महाआघाडीचे उमेदवार महेंद्र पठारे यांचा 10 विरोधात 6 मतांनी पराभव केला. दरम्यान, महापालिकेच्या इतिहासात दोनवेळा स्थायी समिती अध्यक्षपद मिळणारे रासने हे पहिलेच अध्यक्ष ठरले आहे.
मागील टर्ममध्ये रासने यांना शेवटच्या तीन महिन्यांसाठी हे पद मिळाले होते. त्यामुळे त्यांना दोन अंदाजपत्रकही सादर करण्याची संधी मिळाली. या निवडणुकीसाठी पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी काम पाहिले. रासने यांच्या निवडीनंतर महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, खासदार गिरीश बापट, महेंद्र पठारे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी रासने यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
विधानसभा निवडणुकीत आमदारपदी वर्णी लागल्यानंतर सुनील कांबळे यांनी 2019-20 या वर्षाच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उर्वरित तीन महिन्यांसाठी भाजपने हेमंत रासने यांना संधी दिली होती. केवळ तीन महिन्यांसाठी हे पद असल्याने काम करण्यासाठी फार काळ मिळणार नव्हता. त्यामुळे पक्षाने त्यांना पुढील वर्षीही अध्यक्षपद कायम ठेवण्याचे आश्वासन दिले होते.
स्थायी समिती अध्यक्ष पदावर काम करण्याची पक्षाने मला दुसऱ्यांदा संधी दिली. आगामी काळात 7 हजार 390 कोटींच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार असून शहराच्या विकासासाठी महापालिकेचे उत्पन्न वाढवून जास्तीत जास्त विकासकामे मार्गी लावण्यावर आपला भर राहणार आहे.
– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, मनपा