झापोरिझ्झिया- युक्रेनने क्रिमिया आणि रशियाच्या मुख्य भूमीला जोडणाऱ्या पूलावर हल्ला केल्यानंतर चवताळलेल्या रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या ताब्यातील झापोरिझ्झियामध्ये रॉकेटचा जोरदार मारा करायला सुरुवात केली आहे. रशियाच्या या माऱ्यामध्ये किमान 17 जणांचा मृत्यू झाला आहे आणि डझनभर जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रशियाने झापोरिझ्झियात किमान 20 घरांवर आणि 50 अपार्टमेंटवर रॉकेटचा मारा केला. या हल्ल्यामध्ये जखमी झाल्यामुळे किमान 40 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रशियाने हा मारा जेथे केला आहे, तो भाग युक्रेनच्या नियंत्रणात असला तरी रशियाने त्यावर आपला अधिकार सांगितला आहे. या माऱ्यामुळे एक रहिवासी इमारत अर्धवट उद्ध्वस्त झाली आहे.
अलिकडच्या काळात रशियाने झापोरिझ्झियावर वारंवार हल्ले केले आहेत. या झापोरिझ्झिया प्रांताच्या काही भागात पुतीन यांनी गेल्या महिन्यात सार्वमत घेऊन हा भाग रशियाला जोडला असल्याची घोषणाही केली आहे. मात्र या प्रांताची राजधानी रशियाला अद्याप ताब्यात घेता आलेली नाही.
अर्धवट उद्ध्वस्त पुलावरून वाहतूक पुन्हा सुरू
क्रिमिया आणि रशियाला जोडणाऱ्या पूलावर झालेल्या प्रचंड स्फोटामुळे या पूलाचा एक भाग कोसळला आहे. या पूलावरून रेल्वे आणि मोटारी आशा दोन्ही वाहनांची वाहतूक सुरू असायची. ट्रक बॉम्बमुळे झालेल्या स्फोटामुळे पूलावरील इंधनाची वाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या 7 डब्यांचे स्फोट झाले होते. मात्र आता या पूलाच्या उर्वरित भागातून एका मार्गाची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या पूलावरील हल्ला हा रशियाच्या प्रतिष्ठेला धक्का मानला जातो आहे.