मुंबई – शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लाईव्हद्वारे शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी शिवसेना स्थापनेचा संपूर्ण इतिहास सांगितला. लाईव्ह भाषणात ते भावूकही झाल्याचे दिसले. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच हे पक्ष चिन्ह गोठवल्याचे सांगत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, काही दिवसांपूर्वी एक चित्रपट येऊन गेला. कट्यारकाळजात घुसली. मात्र या गद्दारांनी आपल्या आईच्याच काळजात घुसवलेली आहे. अशी ही उलट्या काळजाची माणसं ज्याने हे पवित्र नाव गोठवलं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पवित्र निवडणूक चिन्ह गोठवलं. आनंदाने उकळ्या फुटत असतील त्यांना. पण जनता जनार्धन यांना चागला धडा शिकवेल.
शिवसेना स्थापनेबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 19 जून 1966 जो शिवसेनेचा स्थापना दिन. तो सगळा काळ मला आजही आठवतो. शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ ज्यावेळेला फोडला.
ती वेळ सकाळची नऊ साडे नऊची होती. घरचे आम्ही सगळी लोकं होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून तो नारळ वाढवला गेला आणि त्या नारळातून जे पाणी उडालं त्याचे तुषार माझ्या अंगावरती उडाले. एक क्षणभर जरा अचानक सगळं घडल्यांमुळे अंग शहारलं होतं. पण मला कल्पना नव्हती, कारण मी तेव्हा सहा वर्षाचा होतो. की त्या नारळातून उडालेले पाण्याचे तुषार मला त्या पाण्यानी एवढं चिंब भिजवून टाकतील याची मला कल्पना नव्हती. म्हणता म्हणता मला पक्षप्रमुख पद स्वीकारावं लागलं. मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं आणि ही पूर्ण जबाबदारी मी एका जिद्दीने पुढे घेऊन जातोय. त्यावेळेला त्या पाण्याने मला भिजवलं होतं. आज शिवसेनेच्या किंवा शिवसेना प्रेमींच्या अश्रूमध्ये मी भिजतोय आणि ते अश्रू केवळ दुःखाचे नाहीयेत उद्वेगाचे आहेत.
ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, अनेकांनी तुरुंगवास सोसलेले आहेत. अनेकांनी पोलिसांचे अत्याचार सोसले आहेत. अनेकांनी दमदाट्या सुद्धा सहन केलेल्या आहेत. या सगळं करत करत मोडेन पण वाकणार नाहीत. ही जी एक जिद्द शिवसेना प्रमुखांनी मराठी आणि हिंदूंच्या मनामध्ये धमन्यांमध्ये रुजवली. त्यातनं ही शिवसेना उभी राहिली आणि त्याचा आज महावृक्ष आपल्याला समोर दिसतोय.
पण या गद्दार हा महावृक्ष तोडायला निघाले आहेत.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर नवीन चिन्हासाठी अर्ज करण्याचे निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटाला सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल ही तीन चिन्हे सूचवली आहेत.
उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण लाईव्ह भाषण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –