नवी दिल्ली – जागतिक बेघर दिनानिमित्त दिल्ली ( Delhi ) सरकारने उद्या सोमवारी शहरातील पहिला “झोपडपट्टी महोत्सव” आयोजित करण्याचा निर्णय घोषित केला आहे. हा महोत्सव आठवडाभर साजरा होणार आहे. बेघर नागरीकांच्या समस्यांविषयी जनजागृती करण्याचे काम यावेळी केले जाणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
वैद्यकीय शिबिरे, योगासने, ध्यान वर्ग, स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि वृक्षारोपण यासारखे उपक्रम सर्व आठवडाभर चालवले जातील. आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र देण्यासाठी संबंधित विभागांच्या सहकार्याने शिबिरेही आयोजित केली जातील. कार्यक्रमादरम्यान बेघर लोकांना कपडे, ब्लॅंकेट, औषधे आणि पौष्टिक अन्नाचे वाटप केले जाणार आहे.
दिल्लीतील ( Delhi ) हा पहिला “स्लम फेस्टिव्हल” 10 ऑक्टोबर रोजी सराय काले खान येथील रात्र निवारा संकुलातही आयोजित केला जाईल.तेथे कठपुतळीचे कार्यक्रम, स्किट शो, खेळ, नृत्य,संगीत आणि झोपडपट्टी आणि बेघरांवरील चित्रपटांचे प्रदर्शन यांचा समावेश असणार आहे.