नगर – जिल्ह्यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहाटेपर्यंत पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने अनेक ठिकाणी नदी, नाले, ओढे भरून पाण्याने वाहू लागले आहेत. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी, मांजरसुंबा, शेंडी या परिसरासह नगर शहरात मुसळधार पाऊस झाल्याने सीना नदीला पूर आला होता. रात्रभर पावसाच्या सरी कोसळत असल्याने शहरातील सर्व रस्ते व चौक जलमय झाले होते. दरम्यान, या पावसामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
यंदा रोहिणी, मृग नक्षत्रात जिल्ह्याच्या अनेक भागात चांगला पाऊस झाला. या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. परंतु पुन्हा पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची शक्यता निर्माण झाली होती. परंतु गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारी पहाटेपर्यंत विजेच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस झाला. यामुळे खरिपातील कापूस, सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद पिकांना जीवदान मिळाले आहे.
नगर जिल्ह्यात संगमनेर, अकोले, शिर्डी, नेवासा, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर पाथर्डी, नगर तालुका, नगर शहरातही जोरदार पाऊस झाला. श्रीगोंदा तालुक्यात काष्टी, बेलवंडी, चिंभळे, मांडवगण, कोळगाव, पेडगाव येथे पाऊस झाला. काष्टीत एकाच रात्री 74 मि. मी. पाऊस झाला. शेवगाव तालुक्यात शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. नेवासा तालुक्यात पाचेगाव येथे 40 मि. मी. पाऊस झाला. तर बेलपिंपळगाव येथे 65 मि. मी. पाऊस झाला. नगर शहरासह नगर तालुक्यात जोरदार पाऊस झाला.
57 मि.मी. पावसाची नोंद झाली. शहरातील अनेक घरात पाणी घुसले. भिंगार नाल्यालाही प्रथमच पूर आला होता. नगर तालुक्यात भिंगार, चिचोंडीपाटील, आठवड, दशमीगव्हाण परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या 38.67 टक्के पावसाची नोंद झाली असून गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात तब्बल 296. 2 मि.मी. पावसाची नोंद झाली.