संगमनेर -प्रसिद्ध कीर्तनकार तथा समाजप्रबोधनकार इंदुरीकर महराजांच्या विरोधात संगमनेर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात वैद्यकीय कायद्याच्या कलम 22 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल पाच महिन्यानंतर हा गुन्हा दाखल झाला.
आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीची दखल घेत राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्या आदेशान्वये ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर भंवर यांनी ही फिर्याद दिली आहे.
याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष समितीच्या सचिव ऍड. रंजना गवांदे यांनी 17 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हा शल्य
चिकित्सकांकडे पहिली तक्रार दाखल केली होती. ऍड. गवांदे यांनी राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत त्यांनी 5 मार्च 2020 रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांना आदेश बजावतांना जिल्हा समुचित प्राधिकारी या नात्याने कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी उरण व शेलद येथे केलेल्या कथीत वादग्रस्त वक्तव्याची खातरजमा करुन पी. सी. पी. एन. डी. टी कायद्यातील तरतूदींनुसार योग्य ती कारवाई करण्यास सांगितले होते.
त्यानुसार 12 मार्च 2020 रोजी जिल्हा समुचित प्राधिकारी व पी. सी. पी. एन. डी. टी सल्लागार समितीची बैठक होवून इंदुरीकर महाराज देशमुख यांच्यावर पी.सी.पी.एन.डी.टी कायद्याच्या कलम 22 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर भंवर यांना संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे त्यांनी गेल्या 19 जून रोजी संगमनेरच्या न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने महाराष्ट्रातील वारकारी संप्रदायामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.