पुणे – करोनाच्या रुग्णांवर उपचार करताना शहरातील खासगी रुग्णालयांकडून अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. यावर पवार यांनी वाढीव बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयात करोना प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष पवार यांच्या उपस्थित झाली. त्यावेळी पवार यांनी हे आदेश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पोलीस आयुक्त के. व्यकंटेशम, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, यांच्यासह आमदार, खासदार उपस्थितीत होते.
खासदार पवार यांनी आधीही हा मुद्दा उपस्थित झाल्याचा उल्लेख केला. याप्रश्नी नेमके धोरण काय? बैठका घेऊन हॉस्पिटलला सूचना केल्या नाहीत का? त्या केल्या असतील तर परिस्थिती का बदलली नाही, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. जादा दर आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश पवार यांनी दिले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी, तसेच करोनाविषयक चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना पवार यांनी यावेळी दिल्या. प्रतिबंधित क्षेत्राचाही नियमित आढावा घ्यावा, असे ही त्यांनी सांगितले.
कारवाईचे आदेश दिले आहेत…
हॉस्पिटल विरोधात तक्रारी आल्यानंतर पाच बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्याबाबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांना थेट कारवाईचे अधिकार दिले आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.