माण: दुष्काळी माण तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली असून शेतकरी खुश झालेले आहेत. पिंगळजाई परिसरात झालेल्या पावसामुळे परिसरातील ओढे भरून वाहू लागले आहेत. यामुळे गोंदवले बुद्रुक येतील मोदळ ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे या ओढ्यावरील सर्व बंधारे सुद्धा भरले आहेत. काल रात्री समाधी मंदिर परिसरातील बंधारे भरले.
आज पावसाने पुन्हा सुरुवात केली. या पावसाने मोदळ ओढ्यावरील एक साधारण पाच फूट उंचीचा बंधाऱ्याचा वरचा भाग फुटला.त्यामुळे पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहाच्या दाबाने मंदिर परिसराची संरक्षक भिंत कोसळली. मोठ्या प्रमाणात पाणी वाहून दहिवडी रस्त्यावर आल्याने या रस्त्यावरील वाहतूक काही वेळ बंद झाली होती. या ओढ्यातून पाणी वाहिल्यामुळे माणगंगा नदीला सुद्धा पूर आला.