भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय करणार नाही

शिरूर तहसीलदार लैला शेख यांचा इशारा

शिरूर- शिरूर तालुक्‍यातील सर्वसामान्य नागरिक हा केंद्रबिंदू धरून महसूल विभागात काम करणार आहे. तालुक्‍यातील महसूलनिहाय तक्रार व सूचना पेटी ठेवणार आहे. महसूल विभागात भ्रष्टाचार करणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्याला पाठीशी घालणार नसून कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा शिरूरच्या नवनिर्वाचित तहसीलदार लैला शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला. लैला शेख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे सहायक प्रकल्प संचालक म्हणून यापूर्वी काम पाहिले आहे.

शेख म्हणाल्या की, शिरूर तालुक्‍यातील नागरिकांची गैरसोय व होणारी फरफट थांबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रत्येक मंडलाधिकारी कार्यालय व शिरुर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी तक्रारपेटी ठेवली जाईल. या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा, सूचना व तक्रारी यांची स्वत: दखल घेतली जाणार आहे. तालुक्‍यात अवैध वाळू चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या, गैर काम करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. शिरूर तहसील इमारतीच्या स्वच्छतेबाबत योग्य ती कार्यवाही करणार आहे. जातीचे दाखले, रेशनकार्ड व इतर दाखले वेळेत मिळावे, यासाठी निवडणुकीनंतर जास्तीत जास्त लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, तहसीलदार गुरु बिराजदार यांनी शिरूर तालुक्‍यात अवैध वाळू वाहतुकीवर बसवलेला वचक, कारवाई आदी कामांमुळे जनतेत समाधान असले तरी त्यांची अल्पावधीत झालेली बदली हा तालुक्‍यात चर्चेचा विषय झाला आहे. त्यामुळे नवीन नेमणूक झालेल्या तहसीलदारांपुढे शिरूर तालुक्‍यातील मोठे आव्हान असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.