रस्त्यांवर नागरिकांची तर शेतात काढून ठेवलेले पीक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल
पुणे – पुणे शहरासह जिल्ह्यात दुपारपासूनच उन्हाच्या झळा कमी झाल्या होत्या; पण ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत होता. अखेर संध्याकाळी जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. यात काही ठिकाणी गारपीटही झाली.
अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची धांदल उडाल्याचे पहायला मिळाळे. यामुळे रस्त्यांवर वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती तर शेतात काढून ठेवलेले पीक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली होती.
दरम्यान, जिल्ह्याच्या काही भागांत विजांचा कडकडाटासह पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. दरम्यान, खेड, आंबेगाव तालुक्यांतील काही भागात गारांसह जोरदार पाऊस झाला. सध्या आंब्याचा सिझन असल्यामुळे झाडांना मोठ्या प्रमाणावर कैऱ्या लागल्या आहेत. गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आंब्याचे नुकसान होणार आहे. याबरोबरच शेतात असणारे टोमॅटो आणि अन्य पिकांनाही फटका बसणार असून, अनेक जणांच्या शेतात कांदा काढून ठेवला आहे, तो सडण्याची शक्यता आहे.
पूर, कनेरसर परिसरात कोसळल्या गारा
वाफगाव -खेडच्या पूर्वेकडील दुष्काळी भागात पावसाच्या प्रतिक्षेत असणारा शेतकरी आज सुखावला. वादळीवाऱ्यासह झालेल्या गारांच्या पावसामुळे चारा रचलेल्या गंजी (व्हळया) भिजल्या.
तापलेली जमीन, पाण्याअभावी मोठमोठी झाडे सुकायला लागली होती. पूर येथील गायरान क्षेत्रात 14 ट्री फाउंडेशनने लावलेल्या झाडांना गेली दोन महिने विकत पाणी घेऊन झाडे जगवली. तासभर चाललेल्या पावसाने झाडांना व पशुपक्ष्यांना नक्कीच फायदा झाला. यामुळे शेतकरी आता खरीप पिकाच्या पूर्वमशागतीला सुरूवात करण्याची शक्यता आहे.
आंबेगावकरांना काहीसा दिलासा
मंचर – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात सोमवारी (दि. 29) सायंकाळी अचानक आलेल्या जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली; पण मागील काही उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, मेंगडेवाडी, टाव्हरेवाडी, लोणी, धामणी, जाकरवाडी, शिरदाळे, पहाडदारा, निरगुडसर, पारगाव, शिंगवे, लाखनगाव, देवगाव, काठापुर व पोंदेवाडी आदी गावांमध्ये जोरदार वारे होते. सुमारे अर्धा तास वाऱ्याने जोरदार हजेरी लावल्या नंतर काही प्रमाणात गारांचा पाऊस सुरू झाला, आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली या अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या उभ्या असलेल्या व काढणीस आलेल्या बाजरीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली. या पावसामुळे तरकारी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसह कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
खेडच्या दक्षिण भागात बरसला अवकाळी
चिंबळी – खेड तालुक्याच्या दक्षिण भागात सोमवारी (दि. 29) सायंकाळी विजेच्या कडकडासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. तर या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली होती.