सातारा – सोन्याचांदीच्या दागिन्यांचे कुरियर पुण्याकडे घेऊन निघालेल्यांना काशिळ गावच्या हद्दीत अडवून त्यांच्या तोंडावर स्प्रे मारून लुटणाऱ्या कोल्हापूर येथील दरोडेखोरांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांसह सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणि यवत पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या संशयितांना सातारा न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केलेल्या या 7 जणांच्या टोळीकडून तब्बल 24 लाख 72 हजार 820 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सरफराज सलीम नदाफ (वय 34), मारूती लक्ष्मण मिसाळ (वय 31, दोघे रा. कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सूरज बाजीराव कांबळे (वय 24), करण सायजी कांबळे (वय 23, दोघे रा. सावर्डे, ता. हातकणंगले), गौरव सुनील घाडगे (वय 23, रा. मिनचे, ता. हातकणंगले), समीर धोंडिबा मुलाणी (वय 29) आणि रियाज दस्तगीर मुजावर (वय 33, दोघेही रा. कुंभोज, ता. हातकणंगले) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी त्यांच्या ताब्यातील सोन्याचांदीच्या दागिन्यांचे पार्सल घेऊन कोल्हापूरहून पुण्याकडे निघाले होते. सातारा तालुक्यातील काशिळ गावाच्या हद्दीतील पुलावर संशितांनी फिर्यादी आणि इतरांच्या तोंडावर कोणता तरी स्प्रे मारून त्यांच्या ताब्यातील दागिने लुटले होते. संसयित यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुणे- सोलापूर महामार्गाने इनोव्हा गाडीतून जात असल्याबाबतची माहिती वरिष्ठांनी पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे यांना दिली होती. हेमंत शेंडगे यांनी तात्काळ पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाबळे आणि इतर पोलिसांचे पथक तयार करून कासुर्डी टोलनाका येथे नाकेबंदीसाठी पाठविले.
नाकाबंदी दरम्यान कासुर्डी टोलनाक्यावर संशयितांना पाठलाग करून पकडण्यात आले. चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी 18 किलो 500 ग्रॅम वजनाचे चांदी आणि 79.45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्हयात वापरलेली इनोव्हा गाडी, छऱ्याचे पिस्टल, चाकू, मोबाइल आणि इतर ऐवज असा एकूण 24 लाख 72 हजार 820 रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. संशयितांना बोरगाव पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. संशयितांना सातारा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, कराडचे उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, वाबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रवींद्र भोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, आतिश घाडगे, संजय शेळके, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, अमोल माने, राकेश खांडके, मोहन नाचन, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, शिवाजी भिसे, विक्रम पिसाळ, स्वप्निल माने, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, रोहित निकम, स्वप्नील दौंड, संकेत निकम, शिवाजी गुरव यांनी ही कारवाई केली. या कारवाइ मधील सर्व अधिकारी व अंमलदारांचे सुनील फुलारी, समीर शेख, बापू बांगर यांनी अभिनंदन केले.