मुंबई – मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या सर्व 7 आणि खान्देश, नाशिकपासून ते सोलापूर पर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील सर्व 10 तसेच धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अशा महाराष्ट्राच्या एकूण 23 जिल्ह्यात कार्तिक एकादशी दरम्यान 23 ते 24 नोव्हेंबर केवळ ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार ते सोमवार, म्हणजे 25, 26, 27, नोव्हेंबर दरम्यानच्या तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातला त्यात रविवार 26 नोव्हेंबर (कार्तिक पौर्णिमे) ला पावसाचे वातावरण अधिक गडद होणार आहे. खान्देश, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, या जिल्ह्याच्या क्षेत्रात मात्र मुसळधार पावसाची शक्यता अधिक जाणवते. मुंबईसह कोकणात ह्या पावसाळी वातावरणाचा प्रभाव मात्र अधिक असुन कालावधी तीन दिवसाचाच जाणवतो.
तामिळनाडूतील कन्याकुमारी ते आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या किनारपट्टीसमोर बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून तीन किमी उंचीपर्यंत जाडीच्या हवेच्या कमी दाब क्षेत्राचा पसरले आहे. तसेच 15 डिग्री अक्षवृत्तादरम्यान पूर्वेकडून येणाऱ्या तामिळनाडू आणि केरळ राज्यावरून पश्चिमकडे वाहणाऱ्या जबरदस्त पुर्वी वारा झोता तून वाहणाऱ्या हिवाळी मोसमी वाऱ्यामुळे चक्रीय वाऱ्याच्या स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि केरळ राज्यात सध्या भरपूर पाऊस पडत आहे.
ही प्रणाली भू -भाग ओलांडून पुन्हा अरबी समुद्रात उतरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी समांतर उत्तरेकडे आगेकूच करत आहे. तिथून गुजराथ राज्य कव्हर करून उत्तर महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर दरम्यान डांगी परिसरातून उतरणार आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळी स्थिती
25 नोव्हेंबरला वायव्य उत्तर भारतात आदळणाऱ्या पश्चिमी झंजावाताचा परिणाम थेट मध्य प्रदेश, गुजराथमधून उत्तर महाराष्ट्रापर्यंत होणार आहे. यामुळे या दोन्हीही प्रणल्यांचा एकत्रित परिणाम महाराष्ट्रावर 23 ते 27 नोव्हेंबरच्या पाच दिवसाच्या पावसाळी वातावरणावर होणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या एक -दोन दिवसात चक्रीय वाऱ्याच्या स्थिती आणि कमी दाब क्षेत्रातून बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची बीज रोवण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळची स्थिती आहे.