हैदराबाद – भाजपचे ज्येष्ठ नेते बी एस येडियुरप्पा हे तेलंगणातील निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी येथील जनतेला कॉंग्रेसच्या हमींना भुलून न जाण्याचे आवाहन केले आहे.
कॉंग्रेसने कर्नाटकातील जनतेला पाच हमी दिल्या होत्या पण त्याची अंमलबजावणी त्यांनी केली नाही असा आरोप त्यांनी केला. कॉंग्रेसच्या खोट्या व पोकळ आश्वासनांना येथील जनतेने भुलू नये असे आवाहनही त्यांनी येथील प्रचार सभांमधून केले.
येथे पत्रकारांना संबोधित करताना ते म्हणाले की, ‘कर्नाटक मॉडेल’ हे इतर राज्यांमध्ये कॉंग्रेसचे निवडणूक मॉडेल आहे. कॉंग्रेसने कर्नाटकातील मतदारांना पाच हमींचे आश्वासन दिले होते आणि या वर्षी मे महिन्यात झालेल्या निवडणुका जिंकल्या होत्या.
ते तेलंगणा आणि इतर राज्यांमध्ये “कर्नाटक मॉडेल” विकत आहे. तेलंगणातील कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात राज्यातील मतदारांची फसवणूक करण्यासाठी अशाच फसव्या हमी देण्यात आल्या आहेत असे ते म्हणाले.
दरम्यान, तेलंगनात विधानसभेच्या 119 जागांसाठी येत्या 30 नोव्हेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.