लंडन: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याच्या पाठीवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून येत्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पंड्या संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज होईल.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंड्याला पाठदुखीचा त्रास जाणवू लागला होता. युएईमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चक्क स्ट्रेचरवरून थेट रुग्णालयात नेण्यात आले होते, त्यावेळीच ही दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे स्पष्ट झाले होते. विश्वकरंडक क्रिकेट
स्पर्धेनंतर मात्र पंड्याने या दुखण्यावर उपचार करण्याचे निश्चित करत लंडन गाठले. आता त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून काही दिवसांच्या विश्रांतीनंतर तो पुन्हा एकदा संघात पुनरागमन करेल.