पुणे, दि. 1 -सरकारी आणि खासगी रुग्णालयांत “स्टेमी महाराष्ट्र’ योजनेचा अडीच लाखांहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. यामध्ये रुग्णांनी इसीजी तर केलेच परंतु सहा हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी “स्टेमी’ (एसटी एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रक्शन) टेस्ट करून घेतल्या. यातील बहुतांश रुग्णांच्या हृदयात ब्लॉकेजेस आढळले आहेत.
हृदयाच्या स्नायूच्या भागाला ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमनीवर उपचार केले गेले. सध्या ही योजना 12 जिल्ह्यांमध्ये लागू आहे. जी आता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये वर्षाच्या अखेरीस लागू केली जाईल. वाढत्या अकाली मृत्यूंसह, कोरोनरी समस्यांमुळे होणारे अकाली मृत्यू सुमारे 25% कमी करण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे, ज्यासाठी विविध योजना आणल्या जात आहेत.
30-50 वयोगटातील हृदयविकारामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्याने ही योजना आणली आहे. “स्टेमी’ हा हृदयविकाराचा एक प्रकार आहे जो अधिक गंभीर आहे आणि गंभीर गुंतागुंत आणि मृत्यूचा धोका जास्त असतो आणि म्हणून या योजनेअंतर्गत आजाराचे निदान झालेल्यांवर उपचार केले जातात.
145 आरोग्य केंद्रांत सुविधा
ही योजना 2021 मध्ये सुरू करण्यात आली. दि. 25 सप्टेंबर 2022 पर्यंत 2 लाख 56 हजार 992 लोकांनी इसीजी आणि 6 हजार 144 लोकांनी “स्टेमी’ साठी उपचार घेतले होते. अकोला, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर, नांदेड, नागपूर, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा आणि ठाणे हे ते 12 जिल्हे आहेत. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय अशा एकूण 145 आरोग्य केंद्रांमध्ये या सुविधा उपलब्ध आहेत.
पुरुषांमध्ये हृदयविकार वाढला
महाराष्ट्र सरकारच्या स्टेमी उपक्रमाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात 30 ते 40 वयोगटातील पुरुषांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे, तर 40 ते 60 वयोगटातील महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक आहे. सर्व उपचार केंद्रांमध्ये निदान आणि उपचारासाठी लागणारा वेळ कमी केला जातो. या उपक्रमात नागरिकांना हृदयविकाराचे निदान आणि उपचार केले जातातच याशिवाय थ्रोम्बोलिसिस, अँजिओप्लास्टी आणि बायपास यांचा यामध्ये समावेश होतो.
हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी विकारांमुळे होणारे अकाली मृत्यू थांबवण्यासाठी “स्टेमी महाराष्ट्र’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी मानवी तज्ज्ञांद्वारे चाचणी केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून हृदयविकाराचे त्वरित निदान केले जाते. डिसेंबर 2022 पर्यंत ही योजना उर्वरित जिल्ह्यांमध्ये लागू केली जाईल. ज्यांच्याकडे लाल आणि पिवळे कार्ड आहे, त्यांच्यासाठी ऑपरेशन विनामूल्य केले जाते आणि दारिद्रयरेषेखालील व्यक्ती “एमपीजेएवाय’ पॅनेलवरील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करू शकतात. जिथे महात्मा फुले जीवनज्योती आरोग्य योजनेनुसार उपचार शुल्क आकारले जाते. – डॉ. पद्मजा जोगेवार, सहसंचालक, आरोग्य सेवा संचालनालय, महाराष्ट्र