बेल्हे -ग्रामस्थांना आरोग्याच्या किरकोळ समस्यांसाठी इतरत्र जावे लागू नये यासाठी ग्रामपंचायत पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) यांच्या वतीने सरपंच लता चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते आरोग्य उपकेंद्र पारगावच्या सर्व आशा स्वयंसेविकांना इन्फ्रारेड थर्मामीटर व पल्स ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले. याआधी ग्रामपंचायतच्या माध्यमातून बी. पी. ऑपरेटर व शुगर टेस्टिंग मशिनचेही वाटप करण्यात आले होते.
आशा स्वयंसेविकांना या वस्तू दिल्यामुळे ताप, मधुमेह, रक्तदाब, नाडी परीक्षण या तपासण्या मोफत होणार असल्याचे उपसरपंच रामदास तट्टू यांनी सांगितले. ही सर्व आरोग्य साधने ग्रामपंचायतने दिल्याने करोनाच्या काळात लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास अधिक मदत होणार असल्याचे आशा स्वयंसेविकांनी सांगितले व सरपंच, ग्रामपंचायत यांचे आभार मानले.
त्याचबरोबर आशा स्वयंसेविका अतिशय अल्प मानधनात काम करीत आहेत. त्यांना भरीव मानधन मिळायला हवे, असे मत सरपंच चव्हाण यांनी व्यक्त केले. या प्रसंगी उद्योजक संभाजी चव्हाण, ग्रामसेवक सचिन बनकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन डुकरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच आरोग्य सहाय्यक सुकेशिनी भोर, आरोग्यसेविका शानू इनामदार व सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.