- शिवसेना माजी शाखा प्रमुखाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश
पिंपरी – शिवसेनेचा माजी शाखा प्रमुखाच्या खून प्रकरणी पोलिसांकडून मोठा खुलासा केला आहे. खून झालेला विजय सुर्वे क्रिकेटवर सट्टा घेत होता. सट्ट्यासाठीच त्याने आरोपीला मोठे कर्ज दिले होते. यातूनच खून झाल्याचे उघडकीस आले आहे.
विजय सर्जेराव सुर्वे (वय 40, रा. चिंचवड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो शिवसेनेचा माजी शाखा प्रमुख होता. तो क्रिकेटवर बेटिंग घेत होता. त्यातून त्याचे आरोपींकडे लाखो रुपये कर्ज झाल्याने हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हर्षद अशोककुमार राठोड (वय 29, रा. निगडी) याला पोलिसांनी 11 मार्च रोजी तर त्याचा साथीदार महंमद इकलाख महंमद इद्रिस (वय 33, रा. दिल्ली) याला 15 मार्च रोजी अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सुर्वे याचा मृतदेह मुळशी खुर्द येथे सापडल्यानंतर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी हर्षद राठोड याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी करून पोलिसांनी त्याचा साथीदार इद्रिस याला निगडी मधून अटक केली. दोघांकडे तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली.
विजय सुर्वे हा क्रिकेटवर बेटिंग करत होता. आरोपी हर्षद याच्याकडून बेटिंगवरचे तब्बल 18 ते 20 लाख रुपये सुर्वेला येणे बाकी होते. या पैशांसाठी सुर्वे याने आरोपी हर्षदकडे तगादा लावला होता. तर आरोपी इद्रिस यालाही पैशाची गरज होती. विजय सुर्वे याला दम देण्यासाठी मदत केल्यास इद्रिसला पैसे देण्याचे आश्वासन आरोपी हर्षद याने दिले होते. त्यामुळे इद्रिसही हर्षदला सामील झाला.
आरोपी हर्षद आणि इद्रिस यांनी मिळून सुर्वे याला जमीन दाखवण्याच्या बहाण्याने काळभोरनगर चिंचवड येथून कारमधून ताथवडे येथे मोकळ्या जागेत नेले. तिथे सुर्वे यांच्यावर कठीण वस्तूने मारून त्यांना गंभीर जखमी करत त्यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी सुर्वे यांचा मृतदेह पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकला