पुणे – आई-वडीलांचा आधार नसल्याने आजीकडे राहणाऱ्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तीला विशेष न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. सांभाळण्याच्या आणि लग्न लावून देण्याच्या अमिषाने मुलीसोबत तो हे कृत्य करत होता.
आनंद हरी पवार (वय 45 ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडितेने पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. मार्च ते डिसेंबर 2016 या कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडीत मुलीची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल महत्वाचा ठरला. पीडितेला झालेले आपत्य आरोपीपासूनच झाल्याचा डीएनए अहवाल सादर करून सरकारी पक्षाने सिध्द केले.
आरोपी हा आजही पीडितेशी विवाह करण्यासाठी इच्छुक होता. दोघांच्या वयातील अंतर, आरोपीने पीडित मुलीचा घेतलेला गैरफायदा लक्षात घेता न्यायालयाने शिक्षा सुनावल्याचे ऍड. हांडे यांनी सांगितले. पीडितेच्या आईचे निधन झाले आहे. तर, वडील मनोरुग्ण असून, ते निघून गेले आहेत. त्यामुळे पीडिता 80 वर्षाच्या आजी बरोबर राहत होती.
पवार हा आजीच्या घरी भाडेकरू होता. त्याची कुटुंबिय गावी असल्याने तो एकटाच राहत होता. तो वारंवार पीडितेच्या घरी जात असे. ड्रायव्हर म्हणून कार्यरत असल्याने तो रात्री अपरात्री घरी जाऊन टेरेसवर झोपत होता. कामावरून आल्यावर अंथरून घेण्याच्या बहाण्याने घराचा दरवाजा वाजून तो पीडितेला टेरेसवर घेऊन जायचा. त्यावेळी “मी तुला सांभाळतो, तुला घर घेऊन देतो, तुझ लग्न लावून देतो’ असे सांगून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार करत होता.
घडलेल्या प्रकारा बाबत कोणाला सांगू नको, तु जर घरात सांगितले तर तुझे नातेवाईक आपल्याला मारून टाकतील, अशी भीती तो तिला दाखवत. दरम्यान त्रास होऊ लागल्याने पीडित सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले हा गुन्हा उघडकीस आला.