Congress MP – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला होता. त्यावेळी त्यांनी या खासदारांशी अनौपचारिक गप्पाही मारल्या होत्या.
मोदींसोबत भोजन करणाऱ्यांमध्ये केरळमधील खासदार एन. के. प्रेमचंद्रन यांचाही समावेश होता. प्रेमचंद्रन हे केरळमधील कॉंग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या आरएसपीचे खासदार आहेत. आता मोदी यांच्यासोबतचे हेच भोजन प्रेमचंद्रन यांचे राजकीय नुकसान करणारे ठरणार आहे.
भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस यांचे संगनमत असून राष्ट्रीय स्तरावर ते मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचा आरोप या भोजन प्रकरणावरून डाव्या पक्षांनी केला आहे. केरळमधील कॉंग्रेसच्या आघाडीत आरएसपीचा असलेला समावेश या एका कारणावरून डाव्यांनी कॉंग्रेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कामगार संघटनेने तर याचा निषेध म्हणून केरळच्या कोल्लम येथे मोर्चा काढत प्रेमचंद्रन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांचे भारतीय जनता पार्टीसोबत अगदी जवळचे संबंध निर्माण झाले असल्याचा संघटनेने आरोप केला आहे.
माकपचे नेते ईपी जयराजन म्हणाले की, मोदी यांच्यासोबत जेवण केल्यामुळे एक स्पष्ट झाले आहे की केरळमधील यूडीएफ आघाडी आणि भाजप यांचे जवळचे नाते आहे. देशाचा सामाजिक धागा नष्ट करण्याचे काम करणाऱ्यांनाच प्रेमचंद्रन साथ देत आहेत. ज्यांनी उत्तराखंडमध्ये मशिद आणि मदरसे तोडले त्यांच्याच हातात हात मिळवले जात आहेत.
इंडियन नॅशनल लिगनेही प्रेमचंद्रन यांना लक्ष्य करताना म्हटले की प्रेमचंद्रन यांनी हिंदुत्वाचा अजेंडा असलेल्या पक्षासोबत जेवण केले आहे. त्यांना यूडीएफचेही भगवेकरण करायचे आहे. कॉंग्रेस आणि भाजप यांचीच आघाडी असल्याचे एका मोठ्या मंचावर दाखवण्यासाठीच ते भोजनाला गेले.