थेऊर : हवेली तालुक्यात 24 गावांमध्ये नवीन रास्तभाव दुकान परवाना करावयाचे असल्याने त्याकामी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनेनुसार 31 आॅगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात येत असून ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाने जाहिरनामा गावी दवंडीने प्रसिद्ध करणेविषयी तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी माहिती दिली आहे.
नवीन रास्तभाव दुकानांचा प्राधान्यक्रम महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास यांना प्रामुख्याने राहणार असल्याची माहिती तालुका पुरवठा निरीक्षक कार्यालयातून देण्यात आली आहे.
अर्जासोबत ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्थेचे अथवा सार्वजनिक न्यास यांचे प्रमाणपत्र, जागेच्या मालकीबाबत कागदपत्रे, स्वयंसहाय्यता गटाचे सदस्य दारिद्रय रेषेखालील असल्यास ग्रामसेवकाचे पत्र, सार्वजनिक संस्था, स्वयंसहाय्यता बचत गट यांचे बैंक स्टेटमेंट, शभंर रुपयांच्या स्टॅमपेपरवर अन्यत्र कोठेही शिधावाटप दुकान नसल्याचे प्रतिज्ञापत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
हवेली तालुक्यातील केसनंंद, तळेरानवाडी, गावडेवाडी, उंड्री, फुरसुंगी, कोरेगाव मूळ, नायगाव, साष्टे, वळती, सोरतापवाडी, प्रयागधाम,वढू खुर्द, बिवरी, अष्टापूर, न्हावी सांडस, सांगवी सांडस, शिंदेवाडी, पिसोळी, बुर्केगाव, भावडी, टिळेकरवाडी, जांभुळवाडी, व मुरकुटेनगर या गावांमध्ये नवीन स्वस्त धान्य परवाने मंजूर होणार आहेत.