डॉ. सचिन बारी : कोरेगाव भीमा परिसरातील गावांत बैठका
शिक्रापूर – एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा, पेरणेफाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या समाजबांधवांना ग्रामस्थांनी सहकार्य करून धार्मिक भावना जपत सामाजिक व जातीय सलोखा जपावा. पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी तथा उप पोलीस अधीक्षक डॉ. सचिन बारी यांनी ग्रामस्थांना केले आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळे जगताप, वाजेवाडी, वढू बुद्रुक, कोरेगाव भीमा आदी गावांमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने एक जानेवारीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते, याप्रसंगी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांसह आदी उपस्थित होते.
यावेळी कोरेगाव भीमापासून आठ किलोमीटर अंतरावर जागोजागी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. कोणतीही गाडी कोणत्याही मार्गाने कोरेगाव भीमा येथे जाणार नाही; परंतु मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या समाजबांधवांच्या सोयीसाठी मागील वर्षीप्रमाणे बसेसच्या सुविधा केली आहे. समाजबांधवांसाठी जागोजागी पाणी व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरामध्ये अग्निशमन दल, रुग्णवाहिका, सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेरे उभारण्यात येणार आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशनकडे पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड असा तगडा पोलीस बंदोबस्त बोलाविला आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था प्रत्येक गावात करण्यात आली असल्याचे डॉ. बारी यांनी सांगितले. यावेळी पोलिसांना संपूर्ण सहकार्य लाभेल असे परिसरातील सर्व गावांच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून असे सांगण्यात आले आहे.
बॅरिकेट बसविण्याच्या कामास सुरूवात
कोरेगाव भीमा येथे सुरक्षिततेच्या हेतूने रस्त्यालगत आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेट्स बसविण्याची गरज आहे. हे बॅरिकेट्स बसविण्याबाबत शिक्रापूर पोलिसांनी परिसरातील कंपन्यांना आवाहन केले होते. त्यानुसार परिसरातील सुरक्षिततेसाठी या भागातील किऑन कंपनीने कोरेगाव भीमा परिसरात बॅरिकेट्स बसविण्यास सुरवात केलेली आहे. बॅरिकेट्समुळे एक जानेवारीच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्तात मोठी मदत होणार आहे.