अनधिकृत 12 वीजचोरांचे साहित्य या कारवाईत जप्त
देऊळगावराजे- देऊळगाव राजे आणि परिसरातील वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणकडून शुक्रवारी (दि. 20) वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. परिसरातील वीजचोरीमुळे ट्रान्स्फॉर्मर जळण्याचे प्रमाण वाढले असून, याचा नाहक फटका सातत्याने महावितरणच्या ग्राहकांना बसत आहे, यामुळे वीज वितरण कंपनीचा मोठा तोटा होत आहे, ही बाब लक्षात घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पेडगाव, शिरापूर, हिंगणीबेर्डी, वडगावदरेकर आणि देऊळगावराजे (ता. दौंड) येथील वीजचोरांवर कारवाई करण्यात आली.
देऊळगावराजे येथे 11केव्ही सबस्टेशन आहे. यामधील शेती पंपाचा लोड जास्त होत असल्याने फिडर ट्रिप होण्याची समस्या वाढली होती, ही बाब लक्षात घेऊन शेती पंपाच्या अनधिकृत 12 वीजचोरांचे साहित्य या कारवाईत जप्त करण्यात आले. या पुढे जर अनधिकृत वीजचोरी सापडली तर वीजचोरांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे शाखा अभियंता अमित धोत्रे यांनी सांगितले. ही कारवाई दौंडचे शाखा अभियंता मिलिंद डोंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत शाखा अभियंता अमित धोत्रे, दादा मेंगावडे, शहाजी मेरगळ, ज्ञानेश्वर रसाळ, तानाजी गुणवरे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.