हाथरस प्रकरण : “जिल्हाधिकाऱ्यांकडून दडपण अन्‌ पोलिसांकडून त्रास”

पीडितेच्या कुटुंबियांचा न्यायलयात आक्रोश

  • अंत्यसंस्काराची बळजबरीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारली 
  • सुनावणी उत्तर प्रदेश बाहेर हलवण्याची मागणी

हाथरस – येथे सामुहिक बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या 19 वर्षीय युवतीच्या पार्थिवावर मध्यारात्री गडद काळोखात अंत्यसंस्कार करण्याची जबरदस्ती करण्याची जबाबदारी हाथरसच्या जिल्हाधिकारी प्रविणकुमार लक्‍सर यांनी स्वीकारली आहे. 

अलहाबाद उच्च न्यायलयाच्या लखनौ खंडपीठापुढे हाथरसच्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. तेथे त्यांनी ही कबुली दिली.स्थानिक पोलिस आपल्याला त्रास देत आहेत. तर जिल्हाधिकारी दबाव आणत आहेत. त्यामुळे प्रशासनावर आपला विश्‍वास उरला नाही, असेही पीडितेच्या कुटुंबियांनी सांगितले. 

हाथरसच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यानंतर आपली बाजू मांडली. अतिरिक्त सरकारी वकील व्ही. के. सिन्हा यांनी हा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून त्यावर भाष्य करण्यास नकार दिला. 

या भागात जातीय हिंसा घडवण्याच प्रयत्न होत आहे, अशी माहिती गुप्तचर खात्याकडून मिळाली होती. त्यामुळे काळोख्या रात्रीत अंत्यसंस्कार उरकावे लागले. अंत्यसंस्कारास आणखी उशीर झाला असता तर मृतदेह कुजण्याचा धोका होता, असे ते म्हणाले.

आपल्यावर सरकारकडून अथवा वरीष्ठांकडून कोणताही दबाव आलेला नव्हता, असे त्यांनी सांगितले. हाथरस पीडितेच्या पार्थिवावर जबरदस्तीने केलेल्या अंत्यसंस्काराबाबत अलाहाबद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सोमवारी सुनावणी झाल्यानंतर त्याबाबत आदेश काढण्यात येतील. याबाबत पुढील सुनावणी दोन नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे. न्या पंकज मिथल आणि न्या. रंजन रॉय यांनी पीडितेच्या कुटुंबियांची व्यथा सविस्तरपणे सुमारे दोन तास ऐकून घेतली.

पीडितेच्या कुटुंबियांनी ही सुनावणी एक तर दिल्ली अथवा मुंबईत हलवण्याची मागणी केली. त्यांच्या वकील सीमा खूशवाह यांनी पीडितेच्या कुटुंबियांनी उत्तर प्रदेशच्या बाहेर सुनावणी घेण्याची विनंती केल्याचे सांगितले.

आरोपींना मदत करणाऱ्या विविध गटांकडून या कुटुंबाला अद्याप धमक्‍या येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा महत्वाचा प्रश्‍न आहे. त्यांची सुरक्षा व्यवस्था एक विनोद बनू नये अशी अपेक्षा आहे, असे त्या म्हणाल्या.

तपासाची माहिती गोपनीय ठेवावी म्हणजे या कुटुंबाचे खासगीपण जपले जाईल, अशी विनंती न्यायलयाला करून खुशवाह म्हणाल्या, या प्रकरणाच्या तपासातील कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि अन्य तपशील जाहीर करून या तपासाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पीडितेच्या कुटुंबियांनी त्यांच्या इच्छेविरूध्द अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले. याशिवाय तिच्यावर कोणतेही धार्मिक विधी करू दिले नाहीत. या युवतीची आई म्हणाली, आमच्या मुलीचा चेहराही आम्हाला पाहू दिला नाही. त्यामुळे तिच्याच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले की दुसऱ्या याबाबत आमच्या मनात साशंकता आहे. अंत्यसंस्कार उरकण्यासाठी केलेल्या बळजबरीची तपशीलवार माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली. हाथरस पोलिसांनी योग्य एफआयआर नोंदवली नाही तसेच पीडितेला योग्य उपचार मिळतील याची काळजी घेतली नाही, असे आरोपही त्यांनी न्यायालयात केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.