नवी दिल्ली – राजमाता विजया राजे शिंदे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयांच्या विशेष नाण्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. यावेळी मोदी यांनी राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.
देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी नेतृत्व करणाऱ्यांपैकी एक राजमाता विजयाराजे शिंदे होत्या. त्या धडाडीने निर्णय घेणाऱ्या आणि कुशल प्रशासक होत्या. भारतीय राजकारणाच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्याच्या राजमाता साक्षीदार ठरल्या.
मग त्यामध्ये परदेशी वस्त्रांची होळी करण्याचा काळ असो अथवा देशात जारी झालेल्या आणीबाणीचा काळ आणि राममंदिर जनआंदोलनाचा काळ असो, या सर्व महत्वापूर्ण घटनांच्या राजमाता विजयाराजे साक्षीदार होत्या. यामुळेच सध्याच्या पिढीला राजमाता यांच्या जीवनकार्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
राजमातांकडे हजारो कर्मचारी होते, भव्य राजवाडा होता आणि सर्वप्रकारच्या सोयी सुविधा त्यांच्याकडे होत्या तरीही गरीबांच्या कल्याणासाठी, सर्वसामान्यांसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्या सार्वजनिक सेवेसाठी वचनबद्ध होत्या तसेच समाजाबरोबर सातत्याने संपर्कात होत्या.
राजमाता विजयाराजेंना अनेकदा विविध पदे स्वीकारण्यासाठी आग्रह करण्यात आला होता, परंतु अतिशय नम्रतेने त्यांनी पदांचा स्वीकार करणे नाकारले, अशी आठवणही पंतप्रधानांनी संगितली.
आज देशात नारीशक्ती सर्व क्षेत्रात अग्रगण्य असून प्रगती करीत आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले,
रामजन्मभूमीवर मंदिर उभारण्यासाठी राजमाता विजयाराजे शिंदे यांनी लढा दिला, आता त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांचे श्रीराम मंदिर उभारण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे, हा अद्भूूत योगायोग म्हणावा लागेल, असेही मोदी यावेळी म्हणाले.