राणा दग्गुबाती, पुलकित सम्राट, श्रिया पिळगावकर आणि झोया हुसेन यांचे लीड रोल असलेला “हाथी मेरे साथी’ आता 26 मार्च रोजी रिलीज होणार नाही, या सिनेमाची तमिळ आवृत्ती “अरन्या’ आणि तेलगू आवृत्ती “कादान’ आपल्या नियोजित वेळापत्रकानुसार 26 मार्चलाच रिलीज होणार आहेत.
मात्र हिंदी आवृत्तीला रिलीज होण्यासाठी आणखी थोडा वेळ लागणार आहे, असे निर्माते इरॉस मोशन पिक्चर्सच्या वतीने सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून निर्मात्यांना अनेक कठीण समस्यांचा सामना करावा लागला आहे. अजूनही परिस्थिती फारशी बदललेली नाही. सर्व काही ठीक होईल, असे वाटत असतानाच कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ व्हायला लागली.
सध्याची परिस्थिती बघता “हाथी मेरे साथी’ची हिंदी आवृत्ती आता लगेच रिलीज न करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. या सिनेमाच्या नावावरून राजेश खन्ना आणि तनुजा यांच्या गाजलेल्या “हाथी मेरे साथी’ची आठवण येणे स्वाभाविक आहे. मात् राणा दग्गुबाती आणि पुलकित सम्राट यांच्या “हाथी मेरे साथी’मध्ये वनसंरक्षणाचा मुख्य विषय असणार आहे. अर्थात या सर्व कलाकारांबरोबर हत्ती हे मुख्य कलाकार असणार आहेतच.