नवी दिल्ली – अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला हरियाणात मोठा झटका बसला आहे. येथे पक्षाच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष अशोक तंवर यांनी राजीनामा दिला आहे. राज्यातील विद्यमान स्थितीमुळे आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले असून ते लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील असे मानले जाते आहे.
लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच आपच्या प्रमुख नेत्याने राजीनामा दिल्यामुळे पक्षाच्या अडचणींत भरच पडणार आहे. विशेष म्हणजे हरियाणात लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांतच विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. वर्तमान राजकीय परिस्थितीत कॉंग्रेस पक्षाशी आपली वाढत जाणारी जवळीक पाहता माझी नैतिकता मला पक्षाच्या हरियाणा निवडणूक समिती अध्यक्षपदावर कायम राहण्यास मला अनुमती देत नाही.
त्यामुळे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि अन्य पदांचा माझा राजीनामा आपण स्विकारावा असे तंवर यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. पत्रात ते पुढे म्हणतात की विद्यार्थी दशेत असल्यापासून आपण राजकारणात असून आपले असे मानणे आहे की देशाचे संविधान, देश आणि देशातील नागरिक सगळ्यांत प्रथम आहेत. माझे राज्य आणि देशातील नागरिकांच्या भल्यासाठी मी यापुढेही कार्यरत राहणार आहे.