नवी दिल्ली – हरविंदर सिंग संधू याला केंद्र सरकारने आज दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. तो बब्बर खालसा इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संघटनेचा सदस्य आहे आणि सध्या तो पाकिस्तानच्या लाहोरमध्ये सीमावर्ती एजन्सींच्या संरक्षणाखाली आहे. विशेषत: पंजाबमध्ये तो विविध दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचे आढळून आले आहे.
बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा अर्थात “युएपीए’च्या दहशतवाद्यांच्या यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये 54 जणांचा समावेश आहे. याशिवाय केंद्र सरकारने खलिस्तान टायगर फोर्स आणि जम्मू आणि काश्मीर गझनवी फोर्स या दोन संघटनांनाही दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले.
खलिस्तान टायगर फोर्स ही एक अतिरेकी संघटना पंजाबमध्ये पुन्हा दहशतवाद उफाळून आणते आहे. देशाच्या प्रादेशिक अखंडता, एकता, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्व यांना आव्हान देण्यासह विविध दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे हे तिचे उद्दिष्ट आहे. तर जम्मू आणि काश्मीर गझनवी फोर्स ही संघटना घुसखोरीचे प्रयत्न, अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात दहशतवादी हल्ले करण्यात सहभागी असल्याचे आढळून आले आहे.
ते लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, तहरीक-उल-मुजाहिदीन, हरकत-उल-जिहाद-ए-इस्लामी इत्यादी विविध दहशतवादी संघटनांमधून आपल्या सदस्यांची भर्ती करते, असे गृहमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. “युएपीए’च्या बंदी घातलेल्या यादीमध्ये या संघटनांचा समावेश केला गेला आहे. या यादीमध्ये 44 दहशतवादी संघटनांचा समावेश केला गेला आहे.