मुंबई – शिवसेनेतील अंतर्गत वादाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेचा खटला प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळे मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. या सर्व गोष्टींवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच पूर्णविराम मिळेल, असे मत कायदेतज्ज्ञ, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उज्ज्वल निकम म्हणाले, कायद्याची गुंतागुंत झाली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून जारी केलेला व्हीप ठाकरे गटातील आमदार पाळवणार का? किंवा ठाकरे गटातील आमदारांनी शिंदे गटाचा व्हीप पाळला नाही, तर त्यांच्यावर कारवाई होईल का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
हा कायद्याचा मोठा गुंता निर्माण झाला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे युक्तिवाद करण्यात येतील. त्याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल? हे सांगणं आज कठीण आहे. पण माझ्या मते या प्रकरणात कायद्याचे अनेक मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत, केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, त्याला न्यायालय स्थगिती देईल का? हे बघितले पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.