हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आणि आमदार हर्षवर्धन जाधव हे चांगलेच अडचणीत आले आहेत. कारण त्यांच्यावर कन्नड तालुक्‍यातील पिशोर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होणार याची उत्सुकता लागली आहे. त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होतं त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करणे, चारित्र्यहनन होईल, असे वक्तव्य करणे, आदी बाबींचा यात समावेश आहे. निवडणूक आयोग आणि पोलीस तपास झाल्यावर याबाबत पुढील निर्णय होईल, असेही सांगण्यात आले.

दरम्यान, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनादेखील निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. मुंबापुरात शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग सकपाळ यांच्या प्रचारसभेत लोढा यांनी एका धर्माविषयी केलेल्या विधानामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. लोढा यांच्यासोबतच उमेदवार पांडुरंग सकपाळ, सभेसाठी परवानगी घेणारे अभिजीत गुरव यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. कोणत्याही धर्माविषयी द्वेष पसरवणारे विधान करणे हे आचारसंहितेचा भंग आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.