‘भारत देश तुटतोय’ म्हणणाऱ्या ऑस्ट्रेलियन पत्रकाराला हर्षा भोगलेंचे सडेतोड उत्तर

नवी दिल्ली – सुधारित नागरिक कायद्याविरोधात देशभरात निषेध आंदोलने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध भारतीय क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी आपले मत मांडले. यावरून अनेक जणांनी ट्रोल केले तर काहींनी समर्थनही केले. मात्र भोगले यांच्या पोस्टवरून ऑस्ट्रेलियन पत्रकार डॅनीस फ्रीडमॅन याने भारतातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. भारत देश सध्या तुटतोय, असे डॅनीसने म्हंटले आहे. मात्र यावरुन हर्षा भोगले यांनी डॅनिसला सुनावले आहे.

काहीच दिवसांपूर्वी हर्षा भोगले यांनी म्हंटले होते कि, देशातील तरुण आंदोलन करत रस्त्यावर उतरला असून त्याचं म्हणणं आपण ऐकून घेतलं पाहिजे, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली होती.

भारताविषयी चिंता व्यक्त करत डॅनीस फ्रीडमॅनने म्हंटले कि, मला वाटते की तरुण भारत त्याला काय बनायचे आहे आणि काय नाही हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. हर्षा भोगले यांच्या या फेसबुक पोस्टवर ट्विटरवर अनेक टिप्पण्या आल्या आहेत. मी फक्त या पोस्टसाठी हर्षाचे कौतुक करेन. त्यांचा भारत तुटत आहे. जगातील कोणत्याही देशातील नेत्याची अथवा सत्ताधारी पक्षाची तुलना इतक्या सातत्याने नाझीशी झालेली नाही. या विषयावर आपण सर्वांनी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. या विषयावर कठोर भूमिका घेणाऱ्या आपणमध्ये गौतम गंभीरचा समावेश मी करणार नाही. तो अपवाद आहे कारण त्याने दुफळी निर्माण करणाऱ्या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे डॅनीसने ट्विट केले आहे.

यावर हर्षा भोगले यांनी डॅनीस फ्रीडमॅनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले कि, नाही डेनिस, माझा भारत तुटत नाही. हा उत्साही तरुणांचा देश आहे. हे तरुण अनेक भन्नाट गोष्टी करत आहे. आमचा भारत देश हा पूर्णपणे कार्यरत आणि परिपक्व लोकशाही देश आहे. आम्ही आमच्यातील मतभेद, निराश करणाऱ्या गोष्टींबद्दल उघडपणे बोलतो. असं असलं तरी आम्ही कट्टर भारतीयच आहोत. तू तुलना करण्यासाठी जो शब्द (नाझी) वापरला आहे तसे आम्ही कधीच नव्हतो आणि नसणार, असे ट्विट भोगले यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.