नवी दिल्ली – दिल्ली महानगराला काल रात्रीपासून आज तुफान पावसाने झोडपले आहे. आज सकाळी पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे दिल्लीत अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले असून रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दिल्लीत आज गेल्या 12 वर्षातील सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्या ठिकाणी गेल्या 24 तासांत एकूण 112.1 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
दिल्लीतील सर्व भुयारी मार्गात पाणी शिरले असून असे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणची वाहतूक त्यामुळे अन्य मार्गावर वळवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरी दिल्लीत 125 मिमी इतका पाऊस पडतो.
जवळपास तेवढ्याच पावसाची नोंद एकाच दिवसात झाली. जनपथ रोड, लाजपत नगर, मुनिर्का, लाला लजपतराय मार्ग, मुलचंद बसस्टॅंड, अरबिंदो मार्ग, जुंगपुरा मेट्रो स्टेशन, रिंगरोड, रोहटक रोड आदी भागात प्रचंड पाणी साठले आहे. दिल्लीत अजूनही मध्यम ते अतिजोराच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.