अहमदाबाद – कॉंग्रेसचे गुजरातमधील तरूण नेते हार्दिक पटेल यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली. देशद्रोहाच्या गुन्ह्याशी संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयापुढे हजर न राहिल्याने ती कारवाई करण्यात आली.
पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी केलेल्या आंदोलनामुळे हार्दिक प्रसिद्धीझोतात आले. त्या आंदोलनादरम्यान 2015 मध्ये झालेल्या एका सभेवेळी हिंसाचार झाला. त्यानंतर हार्दिक यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यांची जुलै 2016 मध्ये जामिनावर सुटका झाली. आता त्यांना पुन्हा अटकेला सामोरे जावे लागले.
हजर न राहिल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. त्याची तातडीने अंमलबजावणी करत गुजरात पोलिसांनी हार्दिक यांना अटक केली. आता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. वारंवार गैरहजर राहून जामिनाच्या अटींचा भंग करत असल्याबद्दल न्यायालयाने त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केले. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी हार्दिक यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.