लोकजागर पार्टी राज्यात सत्ता स्थापन करेल : ज्ञानेश वाकुडकर

पक्षाच्या 9 कलमी कार्यक्रमास जनतेचा प्रतिसाद

म्हसवड (प्रतिनिधी) – राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडे सध्या जनतेच्या हिताचे कोणतेच ठोस असे व्हिजन नसल्याने हे सर्व पक्ष भावनिक मुद्यांवर निवडणूक लढवुन सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी खेळून सत्ता स्थापित करीत आहेत. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेली लोकजागर पार्टी या पक्षाकडे एक व्हिजन आहे, पक्षाने 9 कलमी कार्यक्रम हाती घेवून राज्यभर जनतेला साद घालत आहे, त्याला सामान्य जनतेकडुन प्रतिसादही चांगला मिळत असून आगामी काळात राज्यात आमच्या पक्षाची सत्ता येण्यास काहीही अडचण येणार नाही, असा विश्‍वास लोकजागर पार्टीचे अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. म्हसवड येथे लोकजागर पार्टीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वाकुडकर यांनी आपली व आपल्या पक्षाची भूमिका स्पष्टपणे विशद करुन 9 कलमी कार्यक्रम स्पष्ट केला. यावेळी लोकजागर पार्टीच्या प्रगेशाध्यक्षा प्रतिभा बुक्केवार, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजकुमार डोंबे, मनिष नांदे सचिव व महाराष्ट्राचे प्रवक्ते अंबादास गावंडे, मंगल साबळे, रंजना कांबळे, अजित कांबळे, मनोज शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.

पक्षप्रमुख वाकुडकर म्हणाले, सध्याचे महाविकास आघाडीचे व यापुर्वीचे भाजप आघाडीचे सरकार हे ढोंगी सरकार सत्तेत होते. या सत्तेतील सर्वच राजकीय पक्षांकडे कोणतेच व्हिजन नव्हते फक्त सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता मिळवणे हेच यांचे प्रमुख लक्ष आहे. मात्र लोकजागर पार्टी ही सर्वसामान्य जनतेचा पक्ष असून बहुजन मुख्यमंत्री व सर्वसामान्य सत्ता हेच आमचे प्रमुख लक्ष आहे. त्यासाठी आम्ही संपूर्ण राज्यात दौरे करीत असून आमच्या पक्षाची भूमिका सर्वसामान्य जनतेला पटवून देत आहोत. यावेळी सातारा जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या करुन त्यांना प्रदेशाध्यक्ष बुक्केवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.

जिल्हाध्यक्ष म्हणून मंगल साबळे, तानाजी चव्हाण, यासह भिमराव लोखंडे, बाळसिध्द करे, अमोल भिसे, रतन खिलारे, श्‍वेता मोरे, शिवाजी मोरे, प्रवीण ढगे आदींच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या. प्रास्ताविक राजकुमार डोंबे यांनी केले तर आभार अजय टाकणे यांनी मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.