श्रीगोंदा (शहर प्रतिनिधी) – नगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत विविध गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराला श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडे तब्बल 19 चोरीचे मोबाइल सापडले आहेत.
महेश मंगेश काळे (वय 24, रा. कुळधरण, ता. कर्जत, हल्ली रा. वांगी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
श्रीगोंदा शहरातील आळेकर मळ्यातील अक्षय सुरेश आळेकर याने त्याच्या वडिलांसह त्याच्या शेजारील व्यक्तीचा मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार 25 जानेवारी रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानंतर मोबाइल चोराचा शोध घेत असताना, श्रीगोंदा पोलिसांना सदर मोबाइल अट्टल गुन्हेगार महेश काळे याने चोरल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी करमाळा तालुक्यातील वांगी परिसरात सापळा लावत मोठ्या शिताफीने काळे यास जेरबंद केले. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने आळेकर मळ्यातील मोबाइल चोरल्याची कबुली देत चोरलेला मोबाईल पोलिसांना दिला.
पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील 9 चोरीचे मोबाइल व इतर विविध भागांतून चोरलेले मोबाइल, असे दीड लाख रुपये किमतीचे तब्बल 19 मोबाईल श्रीगोंदा पोलिसांनी जप्त केले आहेत.
पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोकॉ दादा टाके, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ संजय काळे, पोकॉ गोकुळ इंगवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.