Israel-Hamas war – हमासने इस्रायलबरोबर तहासाठी वाटाघाटी सुरू केल्या असून या वाटाघाटी आता अखेरच्या टप्प्यात आहेत, असा दावा इस्रायलमधील एका वर्तमानपत्राने केला आहे. हमासच्या दोहामधील पॉलिटब्युरोचा प्रमुख हनियेह याने या वाटाघाटींना संमती दर्शवली आहे.
हमास आणि इस्रायलमध्ये मध्यस्थी करणाऱ्या कतार आणि अन्य मध्यस्थांच्या विनंतीला हमासने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे हनियेहने म्हटले आहे. मध्यस्थांच्या विनंतीनुसार वाटाघाटी अंतिम सुरू आहेत, असे हनियेहने म्हटले असल्याचे अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीनेही म्हटले आहे.
इस्रायलने गाझा पट्ट्यामध्ये सुरू असलेली कारवाई थांबवावी, यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठा दबाव इस्रायलवर आणला जात आहे. दक्षिण-पूर्व आशियाई देशांची सहकार्य संघटना अर्थात “आसियान’च्या संरक्षण मंत्र्यांनीही या युद्धामध्ये होत असलेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून इस्रायलला हमासबरोबर तह करण्याचे आवाहन केले आहे.
इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये अमेरिका, चीन आणि रशियासारख्या अन्य 8 संबंधितांबरोबर चर्चा झाल्यानंतर “आसियान’देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक निवेदन प्रसिद्धीस देऊन इस्रायलला हे आवाहन केले आहे.
गाझा पट्ट्यामध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने अधिक पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
ओलिसांच्या सुटकेचा नेतान्याहू यांचा निर्धार
दरम्यान हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या नातेवाईकांची पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी बेट घेतली असून सर्व ओलिसांची सुखरुप सुटका करणे हे आपल्यासाठी पवित्र आणि सर्वोच्च प्राधान्याचे कर्तव्य आहे, असे म्हटले आहे.
“जोपर्यंत या नागरिकांची सुटका केली जात नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. ही आपली स्वतःची आणि युद्धकालिन मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे.’ असेही ते म्हणाले.