महाविकास आघाडीत धुसफूस? शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमध्ये काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली असल्याचे समजते. या दोन नेत्यांमध्ये “वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या चर्चेतील तपशील सध्या गुलदस्त्यातच आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानावरून महाविकास आघाडीत सध्या नाराजी आहे. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांची निवडणुकीबाबतही खलबत सुरु आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडणूक कशी पार पडेल? या संदर्भातही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या भेटीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीत या विषयांवर काही चर्चा झाली का? याकडेही राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पाच महिने राज्य विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे. अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अशा दोन अधिवेशनांमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने टाळली. अध्यक्षपद कॉंग्रेसकडेच कायम राहील, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिली असतानाही शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जाणीवपूर्वक अध्यक्षपदाची निवडणूक टाळली जात असल्याचा कॉंग्रेस नेत्यांचा आक्षेप आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.