Uttarakhand Haldwani : उत्तराखंडमधील हल्द्वानी शहरातील बेकायदेशीर मकबरा आणि मशीद पाडण्यावरून प्रशासन आणि स्थानिक लोक आमने-सामने आले आहेत. हल्लेखोरांकडून वाहनेही जाळण्यात आली. जाळपोळीच्या घटनेनंतर सर्वत्र गोंधळ उडाला. या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. जिल्ह्याचा संपूर्ण फौजफाटा, सर्व पोलीस व प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. या घटनेबाबत डीजीपी अभिनव कुमार म्हणाले की, आम्ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात व्यस्त आहोत आणि परिस्थिती बिघडू दिली जाणार नाही.
गुरुवारी (8 फेब्रुवारी) महापालिकेच्या पथकाने हल्द्वानी येथील बनभूलपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील मलिक यांच्या बागेतील बेकायदेशीर मदरसा आणि नमाजची जागा जेसीबी मशीनच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. यावेळी महापालिका आयुक्त पंकज उपाध्याय, नगर दंडाधिकारी रिचा सिंग, एसडीएम परितोष वर्मा यांच्यासह महापालिकेचे पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेकायदेशीर मदरसा व नमाजचे ठिकाण जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. या कारवाईदरम्यान मलिक यांच्या बागेच्या आजूबाजूला राहणाऱ्या काही जणांनी पोलिस प्रशासन आणि पत्रकारांवर दगडफेक केली. ज्यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी आणि पत्रकार जखमी झाले, त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या.
यावेळी, महापालिका आयुक्त पंकज उपाध्याय म्हणाले की, बेकायदेशीर मदरसे आणि नमाजची ठिकाणे पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. ज्याच्या शेजारी महापालिकेने यापूर्वी तीन एकर जागा ताब्यात घेतली होती. बेकायदा मदरसा आणि नमाजची जागा सील केली होती. आज उद्ध्वस्त करण्यात आला असून, कारवाईदरम्यान दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात येत आहे.