मुंबई – ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. बॉलीवूड अभिनेता सलमान खान हा शो होस्ट करत आहे. मागील वर्षी हा शो दिग्दर्शक करण जोहरने होस्ट केला होता. यंदाचा हा शो 17 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. बिग बॉसप्रमाणे येथे देखील वीकेंडला सलमान स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतो. मात्र यंदाचा वीकेंड का वार सलमान होस्ट करणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, पूर्वीच्या वचनबद्धतेमुळे सलमान खानला या आठवड्यात ‘बिग बॉस ओटीटी 2’ वीकेंड का वारसाठी उपस्थित राहता येणार नाही. त्याच्या जागी कृष्णा अभिषेक त्याच्या स्टाइलमध्ये हा शो होस्ट करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या आठवड्यात प्रेक्षकांना सलमान ‘बिग बॉस ओटीटी’ चा शो होस्ट करताना दिसणार नाही.
दरम्यान, बिग बॉसच्या घरामध्ये दोन नवीन सदस्य आले आहेत. त्यातील पहिल्या स्पर्धकाचे नाव आहे एल्विश यादव, तो यूट्यूबर असून शॉर्ट फिल्म देखील बनवतो. 25 वर्षीय एल्विश मूळचा गुरुग्रामचा असून सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध नाव आहे. दुसरी आशिका भाटिया आहे, टीव्ही-बॉलिवूड अभिनेत्री आहे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. मात्र यंदाच्या सीझनमध्ये अभिनेत्री पूजा भट्ट ही सध्या विशेष चर्चेत आली आहे.