नवी दिल्ली – ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यास तहखानामध्ये पूजा करण्यावर बंदी घालण्याच्या मशीद समितीच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. व्यास तहखाना येथे पूजेला परवानगी देण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध समितीच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. सुप्रीम कोर्टाने मशीद समितीला हायकोर्टात जाण्याची सूचना केली.
ज्ञानवापी संकुलातील व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याच्या वाराणसी न्यायालयाच्या आदेशाविरोधात मशिदीच्या बाजूने आज पहाटे ३ वाजता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. फाइल पाहिल्यानंतर सरन्यायाधीशांनी मशिदीच्या बाजूने उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांनी मुस्लिम पक्षाच्या वकिलांना सांगितले की, तुम्हाला काही दिलासा हवा असेल तर तुम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकता.
बुधवारी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी संकुलातील व्यासजींच्या तळघरात ३० वर्षांनंतर पूजेला परवानगी दिली होती. या आदेशानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा कडेकोट बंदोबस्तात तळघरात पूजा सुरू केली. गुरुवारी पहाटे मंगला आरतीही झाली.
जिल्हा न्यायाधीशांनी आपल्या आदेशात लिहिले आहे की, राग-भोग पूजन केलेल्या चौक पोलिस स्टेशन हद्दीतील सेटलमेंट प्लॉट क्रमांक ९१३० मध्ये असलेल्या इमारतीच्या दक्षिण बाजूला असलेल्या तळघरात असलेल्या मूर्ती प्राप्त करून घेण्याचे निर्देश प्राप्त जिल्हा दंडाधिकारी यांना आहेत.
सोबतच या संदर्भात रिसिव्हरने सात दिवसांत लोखंडी कुंपणाची योग्य व्यवस्था करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख ८ फेब्रुवारी दिली आहे. दरम्यान, वादी आणि प्रतिवादी पक्ष आपले आक्षेप मांडू शकतात. शैलेंद्र कुमार पाठक व्यास यांनी 25 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी संकुलातील व्यासजींचे तळघर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणे आणि डिसेंबर 1993 पूर्वीप्रमाणे तेथे पूजा करण्याची परवानगी देण्याबाबत खटला दाखल केला होता.