सिंहगडरस्ता – सिंहगड रस्ता धायरी नांदेड फाटा, नांदेड परिसरात गुटख्याची विक्री सर्रास सुरू आहे. बंदी असल्याने 15 रुपयांची गुटख्याची पुडी 25 रुपयांमध्ये विकली जात आहे. शहर तसेच ग्रामीण भागात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत गुटख्याचा मोठा साठा विविध ठिकाणी जप्त केलेला असताना सिंहगड परिसरात कारवाई कधी, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.
राज्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. परंतु, अशा पदार्थांची विक्री काळ्याबाजाराने होत आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात अशा प्रकारच्या पदार्थांना विक्रीस मनाई असतानाही हे नियम मोडून विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे पोलीस स्टेशन परिसरामध्येच गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर नेहमीच कारवाई केली जाते. त्यावर आमचे बारीक लक्ष असते. महिती मिळताच संबंधीतांवर कारवाई करीत आहोत.- सचिन वांगडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अपुऱ्या मनुष्यबळामुळे कारवाईवर मर्यादा येत आहेत. आमच्याकडे तक्रार आल्यावर आम्ही त्यावर कारवाई करतोच. गुटखा विक्री करीत असेल तर माहिती कळविल्यास कारवाई करू.- अर्जुन भुजबळ,सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन