मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या आंदोलनाप्रकारणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होत. त्यानंतर आता सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतले आहे. दोन वर्षांपूर्वी तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांची सातारा पोलीस चौकशी करणार आहेत. दरम्यान, सदावर्ते यांना सध्या १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पण आता त्यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यात आला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर साताऱ्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या. दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यामध्ये उदनराजे भोसले आणि संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ऑक्टोबर 2020मध्ये दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना बोलावण्यात आले होते. मात्र ते गैरहजर राहिल्याने सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणात ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. अखेर पोलिसांची विनंती मान्य करत न्यायालयाने सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे दिल्यानंतर आज सदावर्तेंना सातारा पोलिसांनी ताब्यात घेत साताऱ्याकडे रवाना झाले आहेत.
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तसेच आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. तसेच १७ एप्रिलपर्यंत सदावर्ते यांचा ताबा घेण्याची सातारा पोलिसांना परवानगीही देण्यात आली आहे. अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी साताऱ्यात सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.