मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार असलेले गुलाबराव पाटील राज्यात जेव्हा पासून बंड झाले आहे तेंव्हापासून वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत आहेत. त्यातच आता त्यांनी एका जाहीर भाषणामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात केलेल्या विधानामुळे चांगलेच वादात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सिल्लोडमध्ये गुलाबराव पाटील यांनी केलेल्या भाषणामध्ये कार्यकर्त्यांसमोर आपण आपल्या जीवावर निवडून येतो अशा अशयाचे विधान केले. मात्र हे करत असताना गुलाबराव पाटील यांनी मुस्लीम मतदार आपल्याला बाळासाहेबांचं काय करायचं आहे आपल्यासाठी गुलाबरावच सर्वकाही आहेत, असा विचार करुन मला मतदान करतात असे म्हटले आहे. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगमी अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही उल्लेख पाटील यांनी केला आहे.
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या भाषणामध्ये अनेकदा स्थानिक जनतेचे काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी लोक उभे राहतात याबद्दल बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीनंतर अनेकदा गुलाबराव पाटील हे पानटपरी चालवायचे असा उल्लेख केला होता. यावरुनच पाटलांनी, “३ लाख ८० हजार मतांचा मतदारसंघ आहे. तुम्ही दिसायलाही वाईट नाहीत फार छान दिसता. एकाने विचारलं लोक तुम्हाला का निवडून देतात? कोणत्याही पक्षाने तिकीट दिलेलं असो पण ५० टक्के हे उमेदवारावरही असतं,” असे म्हटले.
तसेच पुढे बोलताना गुलाबराव पाटील यांनी अनेक मुस्लीम आपल्याला काम पाहून मतदान करतात असे म्हटले. जळगाव ग्रामीण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी मतदारसंघातील ९० टक्के मुस्लीम हे आपल्याला काम पासून मत देतात असं म्हटलं आहे. “मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो तिथं ९० टक्के मुस्लिम मला मतं देतात. ते म्हणतात, अपने को क्या करना है तीर कमान से, बालासाहाब से, शरद पवार से, सोनिया गांधी से अपना गुलाबरावही सब है,” असंही गुलाबराव पाटील यांनी भाषणात म्हटलं.